वास्तवदर्शी आराखडा तयार करा
By admin | Published: May 30, 2017 03:26 AM2017-05-30T03:26:22+5:302017-05-30T03:27:06+5:30
शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखडा सद्यस्थितीला धरून नाही. अधिकाऱ्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखडा सद्यस्थितीला धरून नाही. अधिकाऱ्यांना कचरा प्रश्नाचे गांर्भीय नाही, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाहीत. तातडीने उपाययोजना व दीर्घकालीन योजनांचा आराखडा वास्तवदर्शी नाही, कोट्यवधी रुपये देऊनदेखील निधीचा योग्य वापर होत नाही, अशा कडक शब्दांत आमदार, खासदारांनी कचरा प्रश्नावर महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शहराच्या कचरा प्रश्नावर तयार करण्यात आलेला आराखडा प्रशासनाने आमदार आणि खासदार यांच्यापुढे सादर केला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, अॅड. जयदेव गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित उपाययोजना केलेल्या नाहीत, प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील तो योग्य प्रकारे खर्च केला जात नाही, लोकप्रतिनिधी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते, याबाबत नाराजी व्यक्त केली.
तसेच या बैठकीत कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी वाहनाची संख्या वाढविण्यासाठी आमदार, खासदारांनी आपल्या निधीतून काही पैसे देणे, कचऱ्याचे वर्गीकरणावर अधिक भर देणे, कलेक्शन सिस्टिम स्ट्राँग करणे, शंभरपेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे, हद्दीलगतच्या गावांमधील कचरा येऊ नय, यासाठी सुरक्षा पोस्ट निर्माण करणे व नागरिकांचा सहभाग वाढवावा, याबाबत जनजागृती करा अशा सूचना आमदार, खासदारांनी यावेळी केल्या.
महापौर करणार दौरा
कचरा आराखड्याबाबत नागरिकांची मते समजून घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक ३०, ३१ आणि १ जून रोजी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयांचा दौरा करणार आहे. यामध्ये महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्याची चर्चा करणार आहेत. त्यानंतर लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सूचना, अभिप्राय यावर चर्चा करून व आराखड्यात योग्य तो बदल करून अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
उशिराने नाराजी
शहराच्या अत्यंत गंभीर अशा कचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीसाठी आयुक्त कुणाल कुमार बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा तास उशीरा आले. यामुळे उपस्थित आमदारांनी बैठकीमध्येच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांना कचरा प्रश्नासाठी वेळ आहे का, असा सवाल एका आमदाराने उपस्थित केला.