चंद्राचा डिजिटल मॅप तयार- डॉ. प्रकाश तुपे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:21 AM2020-04-26T03:21:20+5:302020-04-26T03:21:27+5:30
गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे.
पुणे : अमेरिकन जिआॅलॉजिकल सर्व्हे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे. त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे. अमेरिकेततर्फे २०२४ मध्ये चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी याचा चांगलाच उपयोग करता येईल, असे ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास, जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांमधून प्राप्त माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या ५१ व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅपची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिआॅलॉजिकल सर्व्हेचे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.
डॉ. तुपे म्हणाले, चंद्राच्या डिजिटल मॅपमध्ये चंद्राच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी विविध रंग वापरण्यात आले आहेत. त्यावरून चंद्राच्या निर्मितीच्यावेळी त्यावर असणारी माती आणि नंतर बदलत गेलेले चंद्राचे स्वरूप याबाबतची माहिती विविध रंगांच्या आधारे डिजिटल मॅप मध्ये दिली आहे. या मॅपच्या माध्यमातून चंद्रावर कोणत्या ठिकाणी उतरावे, चंद्रावरील कोणत्या ठिकाणी कोणता धातू सापडू शकतो हे समजू शकणार आहे. त्यामुळे चांद्रयान मोहिमांसाठी हा डिजिटल मॅप उपयुक्त ठरणार आहे.
>सध्याचा मॅप कायमस्वरूपी
चंद्रावर पाऊस, वारा अशा कुठल्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे
सध्या तयार करण्यात आलेला मॅप हा कायमस्वरूपी वापरला जाणार आहे. भारतालासुद्धा या मॅपच्या आधारे आपली चांद्रयान मोहीम यशस्वीरीत्या राबविता येऊ शकते, असेही तुपे यांनी सांगितले.