महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून शिक्षणाचा दर्जा वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:47 PM2018-12-22T23:47:01+5:302018-12-22T23:47:14+5:30
राज्यात शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. सध्या शिक्षणव्यवस्थेतील बदलाने इंग्रजीकडे जाणारा लोंढा निश्चितच कमी झाला आहे.
आळंदी - राज्यात शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. सध्या शिक्षणव्यवस्थेतील बदलाने इंग्रजीकडे जाणारा लोंढा निश्चितच कमी झाला आहे. राज्यात मुलांचे हित व चांगल्या शैक्षणिक संस्था अधिक मजबूत करण्यास पाठबळ देऊन मराठी शाळांना अधिक चांगले दिवस आणणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आळंदीत दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे २४ वे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदी येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजिण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन शालेय, उच्च, तंत्रशिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील होते. याप्रसंगी माजी आमदार विजय गव्हाणे, आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. सुधीर तांबे, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य डॉ. धनराज माने, डॉ. अनिल पाटील, डॉ. विशाल सोळंकी, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक गंगाधर म्हमाणे, संचालक प्राथमिक विभाग सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष आळंदी राज्यस्तरीय अधिवेशन व अध्यक्ष ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सुरेश धनराज वडगावकर, स्वागताध्यक्ष आळंदी राज्यस्तरीय अधिवेशन गणपतराव बालवडकर, अध्यक्ष-पुणे जिल्हा शिक्षण संस्था मंडळ विजय कोलते, अध्यक्ष-पुणे शहर शिक्षण संस्था मंडळ राजीव जगताप, अध्यक्ष - पिंपरी चिंचवड शिक्षण संस्था मंडळ तुकाराम गुजर, कार्यकारिणी सदस्य - महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ अजित वडगावकर यांच्यासह राज्य महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, नव्याने सुरू केलेल्या पवित्र पोर्टलमुळे शिक्षण संस्था चालवणे सोपे राहिले नाही. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबविण्यास शिक्षकभरती आॅनलाईनचा हेतू आहे. यामुळे या क्षेत्रात पारदर्शकता राहील. यापूर्वीची शिक्षणपद्धती ही घोकंपट्टी होती. आता अध्यापनकौशल्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. जे विद्यार्थी राज्य व देशपातळीवर खेळांमध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांच्यासाठी नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांचा खेळाकडे ओढा आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवत शिक्षणप्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. संस्थाचालक व शिक्षणाधिकारी व मंत्री यांची त्रैमासिक बैठक घेऊन यापुढे काळात शासन निर्णय (जी. आर.) प्रसिद्ध होऊन जाहीर केले जातील. यासाठी शैक्षणिक परिवारातील घटकांची समिती गठित केली जाईल.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर म्हणाले, की शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. या महामंडळामार्फत संस्थांच्या व शिक्षकांच्या अडी-अडचणी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या अधिवेशनातून नवी दिशा मिळेल. महामंडळाचे माध्यमातून शिक्षण संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी ८२ टक्के विद्यार्थी खासगी विनाअनुदानित संस्थेतून शिक्षण घेत आहेत. संस्थांना येणाऱ्या अडचणी समोर मांडत संवाद साधला. महामंडळामार्फत संस्थाचालकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांनी समन्वय समिती गठित करून संस्थाचालकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, सचिव अजित वडगावकर यांनी मनोगत व्यक्त केली. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोकराव मुरकुटे यांनी आभार मानले.
सूर्यकांत मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिकी गायकवाड हिच्या मधुर वाणीतील पसायदानाने समारोप झाला.
पहिल्या सत्रात न्यासाचे व्यवस्थापन या विषयावर सेवानिवृत्त धर्मादाय सहआयुक्त डॉ. एस. वाय. पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शांतिब्रम्ह ह.भ.प. मारोतीमहाराज कुरेकर अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर दुसºया खुल्या सत्रात महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवसातील सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरानुभूती ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा महाराष्ट्राची महागायिका सारेगम महाविजेती कार्तिकी गायकवाड, लग्नाळूफेम गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड आणि परिवाराच्यावतीने संगीत मेजवानी होत आहे.