‘युगनायक विवेकानंद’ संगीतमय चरित्रपटाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:53 PM2018-08-20T13:53:14+5:302018-08-20T13:55:14+5:30

जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत.

Creating musical biopic of 'Yuganayak Vivekananda' | ‘युगनायक विवेकानंद’ संगीतमय चरित्रपटाची निर्मिती

‘युगनायक विवेकानंद’ संगीतमय चरित्रपटाची निर्मिती

Next
ठळक मुद्देपं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध

पुणे : माझ्या बंधू-भगिनींनो... या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत दिलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्रातर्फे ‘युगनायक विवेकानंद’ या संगीतमय चरित्रपट तयार करण्यात आला आहे.  पुण्यात विवेकानंद ज्ञानपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. त्याच्या उभारणीसाठी या चरित्रपटाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग पुण्यात होणार आहेत.
रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांनी ही माहिती दिली. या चरित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केदार पंडित, प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर, नृत्यदिग्दर्शिका अमीरा पाटणकर ,मधुरा आफळे आणि कार्यकारी दिग्दर्शक नचिकेत जोग उपस्थित होते.
या चरित्रपटाचे कथालेखक आणि गीतकार स्वामी श्रीकांतानंदजी आहेत. पुण्यातील प्रयोगांनंतर या चरित्रपटाचे प्रयोग राज्यातील प्रमुख शहरांत सादर केले जाणार आहेत. स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, रामकृष्ण मठाच्या परिसरात विवेकानंद ज्ञानपीठाची उभारणी करण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या चार वर्षांत हे ज्ञानपीठ उभे राहील. त्यात भाषा, संस्कृती आणि मूल्यशिक्षण याविषयीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्कृती आणि मूल्य शिक्षण देणारे विवेकानंद स्कूल आॅफ कल्चर, विविध परकीय भाषांचे ज्ञान देणारी निवेदिता स्कूल आॅफ लँग्वेजेस,  एम. ए. अभ्यासक्रम आणि आॅनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा असलेले वेद संस्कृती विद्यालय यांचा समावेश आहे.  चरित्रपटाच्या प्रयोगातून मिळणारा निधी हा मठाच्या विविध कार्यांसाठी खर्च केला जाणार आहे. 
केदार पंडित म्हणाले, जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत. पं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्यावरील महानाट्याचे स्वप्न साकार झाले आहे. 
संजीव अभ्यंकर म्हणाले, या चरित्रपटाचे महानायक स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाज वापरला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मनात उमटलेली, स्वामी श्रीकांतानंदजी यांनी गीताच्या रूपात मांडलेली आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली भावना माझ्या आवाजातून व्यक्त होते.

Web Title: Creating musical biopic of 'Yuganayak Vivekananda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.