कृतिशील विचारवंत हरपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:56+5:302021-08-27T04:14:56+5:30
अमेरिकेत तत्कालीन काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंडात तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतात आल्यावर ती हातात गिटार घेऊन क्रांतीची गाणी ...
अमेरिकेत तत्कालीन काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंडात तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतात आल्यावर ती हातात गिटार घेऊन क्रांतीची गाणी म्हणत असे. डाव्या विचारांवर तिची निष्ठा होती. परंतु, खुल्या अर्थ व्यवस्थेनंतर ती बाजारपेठीय विचारांशी जुळली आणि शेतकरी संघटनेबरोबर काम करू लागली. दरम्यानच्या काळात समग्र महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणे काम करू लागलो. गेल अतिशय साध्या, मेहनती, लोकांशी नाळ जुळवून काम करणारी व्यक्ती होती. काही मतभेदांमुळे मी समग्र महिला आघाडीतून बाहेर पडले. मात्र, तिने शरद जोशी यांच्याबरोबर काम सुरू ठेवले. महिलांना जमिनीचा अधिकार मिळावा, याबाबत गेल आणि मधू किश्वर यांनी काम केले. शेतकरी संघटनेपासून मी दूर गेल्यानंतरही आमची मैत्री तशीच राहिली. गेल एक अतिशय मनमिळावू सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ती सतत कृतिशील विचारांचा पाठपुरावा करणारी होती.
कासेगाव येथे ती नेहमी सर्वांबरोबर मिळून मिसळून राहिली. शेतकऱ्यांचे कष्टप्रद आयुष्य तिने स्वीकारले. ती पाटणकर यांच्या घरात राहिली. मुलगी प्राची हिला जन्म दिला. भारत पाटणकर यांचे वडील बाबूजी हे त्या काळात नव्या विचाराचे प्रतिनिधित्व करत होते. भारत पाटणकर यांच्याशी विवाह हा गेलचा फार मोठा निर्णय होता. भारत हे तिच्यापेक्षा वयाने लहान होते. अल्झायमर आजार झाल्यानंतर शेवटच्या काळात त्यांनी तिची सेवा केली. पाटणकर यांनी तिच्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करून खऱ्या अर्थाने हेतूपूर्वक तिला जिवंत ठेवलं. भारतीय संस्कृतीमध्ये पती किती एकनिष्ठ असू शकतो हे भारत पाटणकर यांनी दाखवून दिलं. अमेरिकेसारख्या सुस्थित देशात कदाचित तिला घरात राहावे लागले असते. मात्र, आजारी असूनही ती अनेक ठिकाणी फिरली. हळूहळू स्मृती जात असतानाही कार्यरत राहिली. पाटणकर कुटुंबाने गेलसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. तिला एकटे पडू दिले नाही. अमेरिकेसारख्या संपन्न देशात माणसं एकाकी होतात. परंतु, पाटणकर व निकम कुटुंबीयांनी एकत्रितपणे हात घट्ट धरून काम करत भारतीय कुटुंब व्यवस्थेचे आदर्शरूप दाखवले.
गेलची साहित्य संपदा खूप मोठी आहे. भारत पाटणकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती ‘शलाका पाटणकर’ झाली. तिने सुध्दा हे परिवर्तन मनापासून स्वीकारले. भारत यांनी तिला लिहतं केलं. आपल्या लेखनातून तिने विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाकडे कसे पाहावे, याची दृष्टी दिली. अनेकांना तिनं संशोधनाकडं, अभ्यासाकडं वळवलं. त्यामुळं एक कृतिशील विचारवंत असंच तिला म्हणता येईल. अमेरिकेशी जोडली गेलेली नाळ तोडून तिनं भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, हे खूप महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेत विद्यार्थ्यांनी केलेल्या बंडाची ती स्वत: साक्षीदार होती. त्यामुळं क्रांतिकारी विचारांचा धागा घेऊनच ती भारतात आली होती.
वेगवेगळ्या विषयांवर आमच्यात नेहमी चर्चा होत असत. या चर्चांमध्ये गेल खुल्या अर्थव्यवस्थेबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट करू शकत नसे. त्यामुळं नवं अर्थ विषयक धोरण आणि जागतिकीकरण याबाबत आमच्यात नेहमी मतभेद होत होते. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा,’ हे सांगणारी गरिबांची आणि कष्टकऱ्यांची भारतीय संस्कृती आहे. गेलनं सुध्दा आयुष्यभर कष्ट करून एक मोठी उंची गाठली.
- विद्युत भागवत, माजी विभागप्रमुख, स्त्री अभ्यास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(शब्दांकन : राहुल शिंदे)