क्रेडाई देणार पाणीबचतीचे धडे; बांधकामासाठीचा पाणीवापर होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 08:10 PM2020-03-13T20:10:36+5:302020-03-13T20:11:43+5:30
बांधकाम होणार पाणीबचतपूरक
पुणे : बांधकाम करताना पाण्याचा कमीत कमी वापर कसा होईल, तसेच प्रकल्पामधे रहिवासी आल्यानंतर ते पाण्याची बचत कशी करू शकतील, याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम व्यावसायिकांना पाणीबचतीचे धडे देण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.
क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित पाणीबचतीवर आयोजित पहिल्या कार्यशाळेत ते बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव आदित्य जावडेकर, महासंचालक डी. के. अभ्यंकर, सरव्यवस्थापिका ऊर्मिला जुल्का या वेळी उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिक सर्वेश जावडेकर आणि चेन्नईतील पाणी व्यवस्थापन अभ्यासक अभिलाष हरिदास यांनी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
बांधकाम करताना दर्जा राखत पाण्याची बचत कशी करावी, भिंतींवर पाणी फवारण्यासाठी विद्युपत पंपाचा वापर न करता शेतात कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाºया पंपाचा वापर करावा, अशी सूचना जावडेकर यांनी केली. तसेच, बांधकामात ‘सेल्फ क्यूरिंग मोर्टार’सारखे आधुनिक साहित्य वापरावे. मानकानुसार शहरात प्रतिदिन दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठ्याची गरज असते. काळजीपूर्वक वापर केल्यास दरडोई ९० लिटर पाणीदेखील पुरेसे ठरू शकते. स्वयंपाकघरातील नळ आणि शॉवरला गरजेपेक्षा अधिक पाणी न सोडणारे विशेष नळ बसवावेत, असेही जावडेकर म्हणाले.
प्रत्येक घरी पाणी मीटर बसविले पाहिजे. त्यामुळे कोण किती पाणीवापर करते, याची माहिती गृहसंस्थेला उपलब्ध होईल. मीटरमुळे पाणीवापर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्याच जोडीला सोसायटीमधून निघणाºया खराब पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणाही (एसटीपी) उभारली गेल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुनर्वापर आणि त्यामुळे पाणीबचत होऊ शकते, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
साध्या पाणी मीटरमधील त्रुटी दूर करून पाणीवापरावर काटेकोर लक्ष ठेवणाºया ‘आयओटी बेस्ड वॉटर मीटर’ उपकरणाबद्दल हरिदास यांनी माहिती दिली. या प्रकारचे मीटर दक्षिण भारतातील अनेक शहरांत वापरले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधे पाणीबचतीबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आल्याचे हरिदास यांनी सांगितले.
०००