Pune Crime: क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् पावणे दोन लाखांना बसला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:34 PM2022-01-27T15:34:07+5:302022-01-27T15:48:53+5:30
खराडी येथे राहणार्या एका ४४ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पुणे : तरुणाने आपले क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने कस्टमर केअर नंबर सर्च करताना आलेल्या फोनवरुन सांगितल्याप्रमाणे अॅप डाऊनलोड करुन त्याचा पासवर्ड बदलल्याने सायबर चोरट्याने त्याच्या खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये काढून घेऊन गंडा घातल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी खराडी येथे राहणार्या एका ४४ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण घरी असताना आयसीआयसीआय बँकचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करत होता. तेव्हा त्याला एका मोबाईल नंबरवरुन फोन आला. त्याने या तरुणाला एनीडेस्क अॅप व एसबीआय बँक योनो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याने अॅप डाऊनलोड केल्यानंतर योने अॅपचा पासवर्ड बदण्यास सांगितले. त्याप्रमाणे या तरुणाने पासवर्ड बदलला असता त्याच्या एसबीआय बँक खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेऊन फसवणूक केली. त्याने प्रथम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर हा अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.