पुण्यातील नागरिकाच्या नावे दिल्लीत काढले क्रेडिट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:46+5:302021-09-23T04:13:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नागरिकाच्या नावाने दिल्लीत क्रेडिट कार्ड घेऊन त्यावरून ११ महागडे मोबाईल खरेदी करून फसवणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील नागरिकाच्या नावाने दिल्लीत क्रेडिट कार्ड घेऊन त्यावरून ११ महागडे मोबाईल खरेदी करून फसवणूक केली. ते मोबाईल सायबर चोरट्याने पुन्हा दुसऱ्याला विकले. २०१९ मधील या सायबर गुन्ह्यातील २ लाख ४० हजार रुपयांचे ६ मोबाईल सायबर पोलिसांनी दिल्लीतून हस्तगत केले आहेत.
पुण्यातील नागरिकाला मोबाईल कॉल आला होता बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ५ हजार रुपयांचे ई- व्हाऊचर ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती करून घेतली. त्यानंतर या सायबर चोरट्याने या माहितीच्या आधारे नवी क्रेडिट कार्ड हस्तगत केले. या क्रेडिट कार्डच्या आधारे त्याने नवी दिल्लीतून वन प्लस, आय फोन कंपनीचे महागडे ११ मोबाईल खरेदी करून पुण्यातील नागरिकांची ७ लाख २ हजार ४३९ रुपयांची फसवणूक केली. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी हा प्रकार घडला होता. जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल पुण्यातील नागरिकाला आले. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. सायबर पोलिसांकडे याची तक्रार आल्यावर पोलिसांनी ज्या क्रेडिट कार्डवरून हे मोबाईल खरेदी केले गेले त्या मोबाईलची माहिती घेतली. त्यानंतर हे मोबाईल कोणाकडे आहेत, याची माहिती घेतल्यावर या सायबर चोरट्याने हे मोबाईल दुसऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून विकले. क्रेडिट कार्डवरून खरेदी केली असल्याचे मोबाईल खरेदी केल्याची पावती या चोरट्याकडे होती. त्यामुळे ग्राहकांना हे महागडे फोन खरेदी करण्यास वावगे वाटले नाही. पुणे पोलिसांनी जेव्हा या दिल्लीतील मोबाईल धारकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना धक्काच बसला.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस अंमलदार सचिन वाझे, नितेश शेलार, निलेश लांडगे, माधुरी डोके यांनी ही कामगिरी केली.
याबाबत पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की, क्रेडिट कार्डवरून खरेदी केलेल्या ११ महागड्या मोबाईलपैकी ६ मोबाईल दिल्लीतून हस्तगत करण्यात यश आले असून लवकरच या सायबर चोरट्यापर्यंत आम्ही पोहोचू.