वसंत कानेटकर यांना स्वतंत्र मराठी रंगभूमी निर्माण करण्याचे श्रेय : मा. कृ. पारधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:51+5:302021-03-22T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिद्धहस्त नाटककार वसंत कानेटकर यांनी शेक्सपिअरच्या लेखनशैलीचा अनुनय केला नाही तर त्यांनी मराठी रंगभूमीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिद्धहस्त नाटककार वसंत कानेटकर यांनी शेक्सपिअरच्या लेखनशैलीचा अनुनय केला नाही तर त्यांनी मराठी रंगभूमीच्या आशयाला चिकटून लिखाण केले. स्वत:ची स्वतंत्र रंगभूमी निर्माण केली. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटकांचे लेखन त्यांनी केले, परंतु त्यांच्या लिखाणात शोकांतिका दिसून येत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक मा. कृ. पारधी यांनी केले.
नाट्यलेखक प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वसंत नाट्य यज्ञ’ या अनोख्या दोन दिवसीय कार्यक्रमाची रविवारी (दि.२१) सांगता झाली. ‘वसंत नाट्य यज्ञा’ चे उद्घाटन प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते झाले, तर दुसऱ्या दिवशीचा आरंभ रविवारी (दि. २१) ‘देवाचे मनोराज्य’ या नाटकातील प्रवेश अभिवाचनाने झाला. कानेटकर यांच्या ४१ नाटकांतील निवडक प्रवेशांचे सलग दोन दिवस अभिवाचन आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अप्रचलित रागांनी संगीतबद्ध केलेल्या नाट्यपदांचे ‘वसंत गीत’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांना समग्र वसंत वैभवाचे दर्शन घडले. या समारोप समारंभाप्रसंगी १०१ व्या वर्षातही ज्येष्ठ मा. कृ. पारधी यांनी हजेरी लावली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक विजय कुवळेकर, कानेटकर यांचे नातू अंशुमन कानेटकर, प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी तसेच भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे, अध्यक्ष आनंद पानसे उपस्थित होते.
‘वसंत गीते’ या कार्यक्रमात ‘मीरा मधुरा’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘कधी तरी कोठे तरी’, ‘तू तर चाफेकळी’ या संगीत नाटकातील पदांचे सादरीकरण करण्यात आले. ही नाट्यपदे संजीव मेहेंदळे, मेघन श्रीखंडे, गौरी पाटील, विश्वजित मेस्री यांनी सादर केली तर ‘वसंत गीते’ या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे कलाकार पंडित शौनक अभिषेकी यांनी ‘अशी सखी सहचरी’, ‘जिने मला छेडून..’ ही नाट्यपदे सादर केली. प्रा. कानेटकर आणि पंडित अभिषेकी यांच्याविषयीच्या आठवणींची गुंफण करीत रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
....
वसंत कानेटकर यांचे साहित्यवैभव देशातील नव्या पिढीला अनुभवायला मिळावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. जन्मशताब्दी वर्षात कानेटकर यांच्याविषयीचे अनेक कार्यक्रम देश-विदेशात पोहोचविण्याचा मानस आहे.
- अंशुमन कानेटकर, वसंत कानेटकर यांचे नातू
.....