स्मशानभूमीची दुरवस्था
By admin | Published: November 11, 2015 01:47 AM2015-11-11T01:47:27+5:302015-11-11T01:47:27+5:30
येथील वाढती लोकसंख्या व होणारे प्रदूषण लक्षात घेता हडपसर माळवाडी येथील नादुरूस्त डिझेल दाहिनी तातडीने सुरू करावी व देखभाल नियमित व्हावी
हडपसर : येथील वाढती लोकसंख्या व होणारे प्रदूषण लक्षात घेता हडपसर माळवाडी येथील नादुरूस्त डिझेल दाहिनी तातडीने सुरू करावी व देखभाल नियमित व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारा महापौर व महापालिका आयुक्तांकडे नागरिकांनी केली आहे.
शार्टसर्किट झाल्यामुळे हडपसर माळवाडी येथील एकमेव विद्युत दाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. येथील सर्व वायरिंग जळून येथील जुनी कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. डिझेल दाहिनीचा दरवाजा पूर्णपणे जाम झालेला आहे. हडपसरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच माळवाडी येथे एकमेव स्मशानभूमी व डिझेल दाहिनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक चेतन तुपे यांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आली आहे. या डिझेल दाहिनीचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक करतात. वायूचे प्रदूषण व मयतीसाठी लागणारे साहित्य आणि वेळ लक्षात घेता डिझेल दाहिनी अतिशय उपयुक्त असून, हडपसर माळवाडी येथील डिझेल दाहिनीमध्ये शार्टसर्किट झाल्याने दाहिनी बंद अवस्थेत आहे. दाहिनी बंद असल्यापासून सुमारे अनेक मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत.
डिझेल दाहिनी मोफत असल्याने गोरगरिबांना ती परवडते. पण, नादुरुस्त दाहिनीमुळे नाहक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. महिन्यास ४० ते ४५ मृतदेहासाठी या दाहिनीचा वापर होतो, हे लक्षात घेता तातडीने येथील डिझेल दाहिनी सुरू करावी; तसेच दाहिनीच्या देखभालीसाठी तंत्रज्ञासह यंत्रणा ठेवावी, वेळोवेळी सुरळीत देखभाल व्हावी, अशी मागणी येथील शहीद भगतससिंग ट्रस्टचे अध्यक्ष विजय मोरे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे व आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी निवेदनद्वारा केली आहे.
(वार्ताहर)
पारंपरिक पद्धतीने लाकडाचा वापर केल्याने वेळ जास्त लागतो व खर्च वाढत आहे. त्याचबरोबर धरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार डिझेल दाहिनीवर करावेत व होणारे संभाव्य प्रदूषण टाळावे, यासाठी हडपसर-माळवाडी येथील स्मशानभूमीत माहिती फलक लावून जनजागृती केली जात आहे. या फलकांमुळे नागरिकांमध्ये प्रबोधन होऊन दाहिनीच्या वापरात वाढ झाली आहे. तसेच, प्रदूषण टाळण्यासाठी मोठी मदत होत आहे.