क्रिकेटरसिकांची लागणार ‘कसोटी’

By Admin | Published: January 21, 2016 01:01 AM2016-01-21T01:01:51+5:302016-01-21T01:01:51+5:30

गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून

Cricket | क्रिकेटरसिकांची लागणार ‘कसोटी’

क्रिकेटरसिकांची लागणार ‘कसोटी’

किवळे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून, २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रणजी करंडक अंतिम सामना होत आहे. त्यांनतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सत्र नऊचे सामने होणार आहेत. किवळे ते गहुंजे या सेवा रस्त्याची दुतर्फा दुरवस्था झाली असल्याने दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. ते सामन्याच्या वेळी प्रेक्षकांची कसोटी पाहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
अवघ्या २० दिवसांनी येथील स्टेडियमवर टष्ट्वेंटी-२० सामना होणार आहे. नंतर रणजी अंतिम सामना, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सामने होणार असल्याने प्रेक्षकांना येताना व रात्री उशिरा किवळे- ते गहुंजे सेवा रस्त्याने जीव मुठीत धरून ये-जा करावी लागणार आहे. देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने सेवा रस्त्यावरील पुलाची व रस्त्याची अर्धवट कामे, कामाचा निकृष्ट दर्जा, वाहतुकीला होणारे रस्त्यातील अडथळे, रस्त्यावरील धोकादायक खड्डे, असुरक्षित बाजूपट्ट्या, विविध ठिकाणी खचलेला रस्ता, जलवाहिनीचे खोदलेले खोल चर, मार्गदर्शक व दिशादर्शक फलकांचा अभाव अशा समस्यांमुळे प्रत्येक सामन्याच्या वेळी हजारो प्रेक्षकांना तीन अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार असल्याचे रस्त्याच्या सद्य:स्थितीवरून दिसत आहे. सर्वच सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना किवळे ते गहुंजे सेवा रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे व दुरवस्थेमुळे अनेक प्रेक्षकांना त्याचा फटका बसला होता. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती . पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाशेजारून किवळे ते गहुंजे स्टेडियमपर्यंत दोन्ही बाजूंना बनविलेल्या सेवा रस्त्याची अर्धवट कामे तीन-चार वर्षांत पूर्ण झालेली नाहीत, अशी तक्रार वाहनचालकांतून होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयपीएल सत्र पाच सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आधिपत्याखाली एका खासगी ठेकेदाराची सेवा रस्ता तीन महिन्यांत बांधण्यासाठी नेमणूक केली होती. या कामासाठी सोळा कोटी चाळीस लाख रुपये खर्च प्रस्तावित होता. आयपीएल सत्र पाचच्या सामन्यांसाठी रस्त्याची कामे अक्षरश: घाईघाईत ‘उरकण्यात’ आली असल्याचे बोलले जात होते.
सामने संपल्यानंतरही अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामात दर्जा राखण्यात ठेकेदाराला अपयश आले आहे. महत्त्वाची कामे अद्यापही अर्धवट आहेत. काम पूर्ण करण्याची मुदतही कधीच संपली आहे. गहुंजे पुलाखाली बाजूंना रस्ता व्यवस्थित बनविला नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेकदा दुचाकी वाहने घसरत आहेत. किवळे, मामुर्डी व देहूरोड भागातून येणाऱ्या ओढे व नाल्यांवरील पुलाची कामे अर्धवट असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता बनविताना बाजूपट्ट्या तयार केलेल्या नाहीत. त्या नसल्याने सामन्यांच्या वेळी व नंतरदेखील स्थानिक ग्रामस्थांचे अनेक अपघात झाले होते. सेवा रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे विविध ठिकाणी काढण्यात न आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. सर्वत्र पथदिवे बसविलेले नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. द्रुतगती महामार्गाच्या गहुंजेतील पुलाखालील वळण रस्त्यावर समोरून अचानक येणाऱ्या वाहनांचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तेथे रिफ्लेकटर, रेडियम पट्ट्या लावणे गरजेचे आहे.
द्रुतगतीच्या पुलाशेजारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मुख्य जलवाहिनी आडवी येते. रस्त्याला अवघड वळण देण्यात आलेले आहे. पवना जलवाहिनीचे काम बंद पडून चार वर्षे उलटले. ठेकेदाराने जलवाहिनीसाठी खोदलेले चर रस्त्यालगत असल्याने वाहनचालक नवखे असल्यास अंदाज न आल्यास थेट चरात पडण्याची शक्यता आहे. सेवा रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय योजण्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष होत आहे. सामन्याच्या वेळी पुरेसे दिवे लावले जात नाहीत. (वार्ताहर)

Web Title: Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.