‘सिंहगड’च्या मारुती नवलेंवर अपहाराचा गुन्हा
By admin | Published: February 24, 2016 03:38 AM2016-02-24T03:38:00+5:302016-02-24T03:38:00+5:30
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कापून घेऊन ते कार्यालयात न भरता ३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष
पुणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कापून घेऊन ते कार्यालयात न भरता ३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती नवले यांच्यासह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे़ त्याचबरोबर, संस्थेचा शेअर म्हणून भरावयाची ९ कोटी २७ लाख रुपयांची रक्कमही भविष्यनिर्वाह निधीत त्यांनी जमा केली नाही.
नवले यांच्यासोबत सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी प्रकाश लोखंडे (रा़ अश्विनी सोसायटी) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भविष्यनिर्वाह
निधी संगठण कार्यालयाचे निरीक्षक अविनाश पात्रा (वय ४५, रा़ वडगाव
धायरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या एरंडवणे येथील संस्थेत ४ हजारांहून अधिक कर्मचारी काम करीत असून, त्यांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम एरंडवणे कार्यालयातून भरणा केली जाते़ या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिवार्ह निधीची रक्कम कापूनही संस्थेने मे २०१५पासून तिचा भरणा केला नाही़ भविष्यनिवार्ह निधीच्या सहायक आयुक्तांकडून आदेश मिळाल्यानंतर २७ जानेवारी २०१६ रोजी पात्रा यांनी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयाला भेट दिली़ तेथील अधिकारी प्रकाश लोखंडे यांच्याकडील कागदपत्रे पाहिली़ त्यात सॅलरी स्टेटमेंट व इतर कागदपत्रांची तपासणी केली़
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील कामगारांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम कापून घेऊन कामगारांचे वेतन खाते असलेल्या चिंचवडमधील आनंद को-आॅप़ बँक खात्यात जमा असल्याचे आढळून आले आहे़ याबाबत भविष्य निधीची रक्कम जमा का केली नाही, अशी लेखी नोटीस दिल्यानंतरही त्यांनी कामगारांच्या भविष्य निधीची तसेच कंपनीच्या शेअरची रक्कम भरली
नाही़ त्यामुळे भविष्यनिवार्ह निधी कार्यालयातर्फे अविनाश पात्रा यांनी मंगळवारी डेक्कन पोलीस ठाण्यात ३ कोटी ३८ लाख १ हजार ८ रुपयांची रक्कम जमा न करता परस्पर अपहार केल्याबद्दल फिर्याद दिली आहे़ मारुती नवले व प्रकाश लोखंडे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांनी कलम
४०६ खाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुचेता खोकले तपास करीत आहेत़
मे २०१५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत कामगारांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम ३ कोटी ३८ लाख १ हजार ८ रुपये व मालकाचे शेअर आॅक्टोबर २०१४ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीतील ९ कोटी २७ लाख ९४ हजार ५५१ रुपये भविष्य निधी संगठन कार्यालयाकडे जमा केले नसल्याचे आढळून आले़