सरपंचांसह १३ जणांवर गुन्हे
By admin | Published: February 1, 2016 12:43 AM2016-02-01T00:43:29+5:302016-02-01T00:43:29+5:30
माळेगाव येथील अवैध धंद्यावरून झालेल्या वादा प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सरपंचासह एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
बारामती : माळेगाव येथील अवैध धंद्यावरून झालेल्या वादा प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सरपंचासह एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
माळेगाव येथील विक्रांत सुभाष नलवडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मोरे, टॉमी मोरे, सारंग शिंदे, प्रफुल्ल जगताप, बंडा मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव येथील अवैध धंद्यांवर पोलिसांसह छापा टाकायचा आहे, असे सरपंच जयदीप तावरे यांनी सांगितले होते. त्यानुसार निखिल माने, पुष्कर निंबाळकर, विक्रम मुळीक, विकास खोमणे, किरण चांदगुडे हे तेथील दुकानाजवळ जमले. सरपंच पोलिसांसह तेथे छापा टाकला. मात्र, या ठिकाणी कोणीही सापडले नाही. त्यामुळे टेबल, खुर्ची बाहेर काढून ठेवून टेम्पोची वाट पाहताना माने याच्या हातावर, डोक्यावर शिंदे याने वार केले. इतरांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तर विरोधी तक्रारीत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सरपंच जयदीप दिलीप तावरे, टिल्लू नलवडे, किशोर व्यंकटराव तावरे, निखिल माने, विकास खोमणे, समीर घोरपडे, टिंकू मुळीक, राजेंद्र माणिक चव्हाण या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.