गोपाळ महार समाधी छताची तोडफोड सरपंचासह ४९ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:15 AM2017-12-30T05:15:37+5:302017-12-30T05:15:40+5:30
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीच्या माहितीचा फलक व छताची तोडफोड केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ४९ जणांवर अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा (जि. पुणे) : वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीच्या माहितीचा फलक व छताची तोडफोड केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ४९ जणांवर अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी घटनास्थळी भेट देऊन हस्तक्षेप केला.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा सुभाष ओव्हाळ (रा. वढू बुद्रूक ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. सकाळी गावातील काही युवकांनी गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीस्थळाकडे जाणारा फलक काढून टाकत समाधीवरील छताची तोडफोड केली. स्थानिक बौद्ध समाजाने तत्काळ आक्षेप नोंदवले. त्यानंतर दोन्ही समाजात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दंगल नियंत्रण पथकही या वेळी हजर झाले. हक यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरण नियंत्रणात आले. या प्रकरणी पुढील बैठक ४ जानेवारीला होणार आहे.