आमदार मेधा कुलकर्णींसह ८0 जणांवर गुन्हे
By admin | Published: December 13, 2015 02:55 AM2015-12-13T02:55:53+5:302015-12-13T02:55:53+5:30
आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी वगळण्याच्या मागणीसाठी शनिवारी पेशव्यांच्या वंशजांसह विविध संघटनांनी शनिवारवाड्यावर आंदोलन केले.
पुणे : आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी वगळण्याच्या मागणीसाठी शनिवारी पेशव्यांच्या वंशजांसह विविध संघटनांनी शनिवारवाड्यावर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा पुतळा जाळण्यात आला. विनापरवाना मोर्चा काढणे तसेच पुतळा जाळल्याप्रकरणी आमदार मेधा कुलकर्णींसह तब्बल ८0 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या निषेध मोर्चाचे आयोजन ‘श्रीमंत पेशवे प्रतिष्ठान’च्या वतीने करण्यात आले होते. बाजीराव मस्तानी या चित्रपटाविरोधात शनिवारी कुंदनकुमार साठे यांनी काढलेल्या या मोर्चादरम्यान भन्साळींच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. त्यानंतर हा पुतळा जाळण्यात आला. मोर्चा काढण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी महापालिका आणि पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विनापरवाना मोर्चा काढणे, पुतळा जाळणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारणांवरून आमदार मेधा कुलकर्णी, कुंदनकुमार साठे, श्रीकांत मोघे, मिलिंद काची, पेशव्यांचे वंशज उदयसिंह भोसले पेशवे, महेंद्रसिंह पेशवे, सत्यसिंह राजे दाभाडे, मंदार लवाटे, पराग गोखले, शशिकांत लेले, अनिल गाणू, अनुराधा सहस्रबुद्धे, विलास तुपे, संजय कोटणीस यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांनी सांगितले.