अपघाताप्रकरणी राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाच्या संचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:55+5:302021-01-08T04:34:55+5:30
लोकमत न्यूज नेवर्क नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या किसन ज्ञानबा बदक (वय ७२, रा. हरिश्चंद्री) या वृद्धाचा ...
लोकमत न्यूज नेवर्क
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या किसन ज्ञानबा बदक (वय ७२, रा. हरिश्चंद्री) या वृद्धाचा मोटारीने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यामुळे राजगड पोलिसांनी मनोज सुरेश भोकरे व पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) संचालक पदाधिकारी यांच्यावर या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरिक्षक विनायक वेताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी किसन बदक हे कापुरव्होळ कडून हरिश्चंद्री येथे जाण्यासाठी पायी जात होते. यावेळी साताऱ्याहून भरधाव येणाऱ्या मोटारीने बदक यांना जोरदार धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालक मनोज सुरेश भोकरे व एनआयएचे संचालक पदाधिकारी यांच्या विरुद्ध फिर्यादीची कायदेशीर फिर्याद असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही.बी.वेताळ यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक भोस करीत आहेत.
चौकट
गेल्या दोन आठवड्यापूर्वी हरिश्चंद्री येथील तरुणाचा महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. तसेच गेले अनेक वर्षे हरिश्चंद्री येथील ग्रामस्थांनी महामार्गावर उड्डाण पूल बांधणेसाठी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत. असे अपघात होऊ नये म्हणुन गेल्या १४ डिसेंबर रोजी ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महन आंदोलक करणार होते. मात्र, याप्रकरणी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी मध्यस्थी केली होते.
चौकट
ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
हरिश्चंद्री (ता. भोर) गावच्या हद्दीतील महामार्गावर आजपर्यंत २१ बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलीस चौकीत मध्यरात्रीपर्यत ठिय्या मांडला होता. तर गुरुवारी पुन्हा संतप्त ग्रामस्थांनी गावात आलेल्या रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना कोंडीत घेऊन नुकसानभरपाई आणि भुयारी मार्गाचे काम सुरु होत नाही तोपर्यत त्यांना गावात डांबून ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर सेवा रस्त्याचे काम सुरु करून नुकसानभरपाई देण्याची ग्वाही रिलायन्सने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.