Crime News: लष्कर भरतीच्या पेपरफुटीप्रकरणी लेफ्टनंट कर्नलसह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:17 AM2021-12-28T11:17:46+5:302021-12-28T11:20:49+5:30
लष्करातील क दर्जाच्या पदांसाठी २०१९ मध्ये भरती झाली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती...!
पुणे : लष्करातील क दर्जाच्या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या २०१९ च्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी सीबीआयच्या पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर्न कमांडच्या आर्मी ऑर्डनन्स कोअरमधील एका लेफ्टनंट कर्नलसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयला गेल्या महिन्यात मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोकची पत्नी प्रियंका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये सीबीआयने लष्कर पेपरफुटी प्रकरणात केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी टी. गोपाल नाईक यांनी फिर्याद दिली आहे.
लष्करातील क दर्जाच्या पदांसाठी २०१९ मध्ये भरती झाली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयने नजर ठेवून तपास केला. त्यावेळी आरोपी विकास राजयादा याने आठ सप्टेंबर रोजी आरोपी सुसंता नाहकच्या पत्नीच्या मोबाइलवर परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाठवली. त्यानंतर नाहक याने ती उत्तरपत्रिका त्या दिवशी प्रियंका हिच्या मोबाइलवर पाठविल्याचे समोर आले. त्यासाठी विकास याला ५० हजार व ४० हजार रुपये अशा दोनदा रकमा पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच, आरोपींच्या मोबाइलमधील चॅट पाहिल्यानंतर विकास, सुसंता, अलोककुमार आणि त्याची पत्नी प्रियंका यानी २०२०-२१ मध्ये झालेल्या विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिका फोडण्यात त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक एम. आर. कडोले यांनी दिली. उपाधीक्षक राजीव कुमार अधिक तपास करीत आहेत.