बालविवाह केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड
By नितीश गोवंडे | Published: November 6, 2023 06:51 PM2023-11-06T18:51:21+5:302023-11-06T18:51:40+5:30
पतीवर डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुणे : मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असूनही लग्न केले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पतीवर डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते ४ नोव्हेंबर पर्यंतच्या काळात कोंढव्यातील शिवनेरी नगर येथे घडला. कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉक्टर उन्मेश रमेश अंभोरे (२९, रा. डॉक्टर्स रुम, कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ) यांनी कोंढवा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार आफताब आक्रबुद्दीन शेख (२२, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब याचा जानेवारी २०२३ मध्ये विवाह झाला. विवाहाच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे आफताबला माहीत होते. तरीदेखील त्याने तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती ९ महिन्यांची गरोदर राहिली. दरम्यान, पीडित मुलगी कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली असता तिच्या वयाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुदळे करत आहेत.