८८ लाख वसुल केल्यानंतरही तगादा लावणाऱ्या सावकारांवर गुन्हा
By विवेक भुसे | Published: December 3, 2023 03:57 PM2023-12-03T15:57:42+5:302023-12-03T15:59:09+5:30
तारणासाठी दिलेले २१ तोळे दागिन्यांचा अपहार, १० जणांवर गुन्हा दाखल
पुणे: कोरोनाच्या काळात आजारपणात घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज घेतले. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे १० ते ४० टक्के व्याज आकारुन तब्बल ८८ लाख २५ हजार रुपये वसुल केल्यानंतरही मुद्दल व व्याजाची मागणी ते करत राहिले. कर्जासाठी तारण दिलेले दागिन्याचा अपहार करण्यात आला, अशा सावकारी व अपहार करणार्या १० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी सावकारी कायद्याखाली १० जणांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याप्रकरणी कोथरुडमधील एका शिपायाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल ऊर्फ दिगंबर पुरुषोत्तम काची (वय ३७), सुजित सुधीर लाजुळकर (वय ३४), विकी ढवळे (वय ३५) जयकुमार सदाशिव पाटील (वय ४०), बाळासाहेब ऊर्फ नितीन करंडे (वय ४२), अक्षय सागर, निखील आल्हाट, संतोष उत्तम सोळसे (वय ३७), निशा व राजेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२१ ते ३ डिसेबर २०२३ दारम्यान सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम करतात. त्याचबरोबर ते रिक्षा चालवत असतात. कोरोनाच्या काळात त्यांनी आजारपणामध्ये एकाकडून व्याजाने पैसे घेतले. ते फेडण्यासाठी दुसर्याकडून व्याजाने पैसे घेतले. दुसर्याने ते पैसे देताना व्याज कापून पैसे दिले. अशा प्रकारे एकाचे पैसे फेडण्यासाठी आणखी अधिक व्याजाने ते तिसर्या, चौथ्याकडून पैसे घेत गेले. ही रक्कम ७० लाखांपर्यंत गेली. ते पैसे फेडताना फिर्यादीने ८८ लाख २५ हजार रुपये सहा जणांना परत केले. तरीही ते मुद्दल व व्याजाच्या रक्कमेची मागणी करत राहिले. सुजित लाजुळकर याने तर पैसे देण्यास नकार दिल्यास फिर्यादीचे ऑफिसचे बाहेर येऊन फाशी देण्याची धमकी दिली. हे पैसे देण्यासाठी निखील आल्हाट, संतोष सोळसे व इतरांनी त्यांना कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. तारण म्हणून त्यांच्या पत्नीचे २१ तोळे दागिने घेतले. त्यांना कोणतेही कर्ज मंजूर करुन न देता दागिन्यांचा अपहार केला. तसेच त्यांची मोटारसायकल गहाणखत करतो, असे म्हणून परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी करुन फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.