नगरसेवक साईनाथ बाबरसह मनसेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:48+5:302021-03-25T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरून सहायक कार्यालयात सर्वत्र ओला-सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरून सहायक कार्यालयात सर्वत्र ओला-सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वत: नगरसेवक असतानाही बाबर यांनी तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. सहायक आयुक्त किशोरी शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागांतील स्वच्छ सर्वेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. याची साईनाथ बाबर यांनी गोरख इंगळे याच्याकरवी फोन करून माहिती घेतली. शिंदे या कार्यालयात नाहीत, हे लक्षात आल्यावर बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे, अशी विचार केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. कार्यालयात सोबत आणलेला ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. पुन्हा कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये देखील कचरा टाकून घाण केली. तसेच कार्यालयातील इतर सहकार्यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला. कोविड १९चे कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.