महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, वायरमनवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:18+5:302021-07-31T04:11:18+5:30
नारायणगाव वीज महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे, शाखा अभियंता सतीश मोरे, वायरमन योगानंद वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल ...
नारायणगाव वीज महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे, शाखा अभियंता सतीश मोरे, वायरमन योगानंद वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्याद भास्कर यादव पटाडे (रा. पटाडेमळा, बोरी खुर्द, साळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. शेतकरी यादव भीमाजी पटाडे (वय ७०) आणि श्रीकांत यादव पटाडे (वय ३७) तसेच महादेव काळे हे रविवारी (दि. २५) शेतात काम करत असताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. पटाडेमळा येथील पटाडे यांच्या शेतातून ५ वर्षांपासून ११ केव्ही बंद अवस्थेतील विद्युत लाईनचे पोल उभे होते. त्यामध्ये पोलवरील ३ तारांपैकी २ विद्युततारा मागील ५ महिन्यांपासून पटाडे यांच्या शेतात पडल्या होत्या. याबाबत वायरमन योगानंद वाडेकर व शाखा अभियंता सतीश मोरे यांना तारा व पोल काढण्यासाठी वारंवार सांगूनही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यानंतर बोरी खुर्दचे सरपंच कल्पना काळे व उपसरपंच महेश काळे यांनीही मार्च महिन्यात नारायणगाव येथील कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना भेटून लेखी पत्र दिले होते. हे पत्र देऊनही सोनवणे यांनी ही याबाबीकडे दुर्लक्ष केले. या बंद असलेल्या विद्युत लाईनच्या तारा खालून महादेव काळे यांच्या शेतात चालू स्थितीतील थ्रीफेज विद्युत लाईन गेली आहे. रविवारी दुपारी यादव पटाडे व श्रीकांत यादव पटाडे हे उसाच्या शेतात तणनाशक फवारणी करीत असताना अचानक बंद पडलेल्या विद्युत तारांमध्ये वीजप्रवाह येऊन पिता-पुत्राचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. त्याच वेळी महादेव काळे यांचा पाळीव कुत्रा त्या ठिकाणी आला असता त्याचाही या तारांचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेसंदर्भात तातडीने आमदार अतुल बेनके यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची गंभीर दखल घेत या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणारे अधिकारी व वायरमन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिली होती. तसेच पटाडे कुटुंबीय, सरपंच कल्पना काळे व उपसरपंच महेश काळे, ग्रामस्थांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत नारायणगाव पोलिसांनी वरिष्ठ आधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी गुन्हा दाखल केला.