सीबीआयकडून अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:20 PM2018-03-28T23:20:41+5:302018-03-28T23:20:41+5:30
अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेतील नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीच्या मुदती ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील ४ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेतील नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीच्या मुदती ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील ४ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिका-यांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.
अरुण गोपाळ देशपांडे, पल्लवी मुखर्जी, निशा प्रकाश आणि गायत्री प्रधान अशी या चार अधिका-यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अरुण देशपांडे हे अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना २०१२ -१३ मध्ये नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीच्या वतीने दीड कोटी रुपयांची मुदत ठेव बँकेत २ वर्षांसाठी ठेवण्यात आली होती. त्याची मुदत १८ मे २०१४ रोजी संपणार होती. परंतु त्यापूर्वीच देशपांडे यांनी मुदत ठेव खाते बंद केले. त्यांनी अन्य अधिका-यांशी संगनमत करून या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्याबरोबरच विविध खात्यात हस्तांतरीत करण्यात आली. दरम्यान त्यांची बदली हिंजवडीवरून बँकेच्या लक्ष्मी रोड शाखेत करण्यात आली. त्यांनी या मुदत ठेवीच्या व्याजाची रक्कम अन्य लोकांच्या खात्यावर हस्तांतरीत केली. बदली झाल्यानंतरही त्यांचा हा प्रकार सुरू होता. यामुळे १ कोटी ६० लाख ५९ हजार ९९४ रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चारही अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे पोलीस निरीक्षक मनीष प्रभुणे अधिक तपास करीत आहेत.