खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:22+5:302021-07-31T04:12:22+5:30
लोणी काळभोर : एका हॉटेल चालकाकडे दरमहा १० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल ...
लोणी काळभोर : एका हॉटेल चालकाकडे दरमहा १० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यांतील ७ पैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
शुभम ऊर्फ दद्दू अशोक कानकाटे (वय १८), साईराज कानकाटे (वय १९, दोघे रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली), अमित नवनाथ डोरले (वय २०, रा. सोरतापवाडी, मु. रा. उपळई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आप्पा गोरे, अमोल चौधरी व इतर दोन अनोळखी जणांवरही गुन्हा दाखल झाला असून ते बेपत्ता आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (२६ जुलै) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अमित डोरले याने दद्दूभाईशी बोला असे म्हणून फोन पुजारी यांचेकडे दिला त्यावेळी समोरून मी गोरख कानकाटे यांचा पुतण्या दद्दूभाई बोलतोय, मला ५० हजार रुपये हफ्ता ५ तारखेपर्यंत पोहच कर, असे सांगितले. त्यांना हप्ता न दिल्याने, त्याच दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघे एका दुचाकी वरून आले व हातातील कोयते हवेमध्ये फिरवून, दहशत निर्माण करुन, लॉजवर दगडफेक केली. मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक घाबरुन पळून गेले. त्यांनी फेकलेल्या दगडामुळे लॉजच्या समोरील दरवाजा व खिडक्यांचा काचा फोडल्या. आम्ही दद्दूभाईची माणसे आहोत, तुम्हाला येथे लॉज चालवायचा असेल तर आम्हाला हफ्ता द्यावाच लागेल, नाहीतर लॉज चालवू देणार नाही, असे म्हणून हत्यारांचा धाक दाखविला. त्यानंतर बुधवार (२८ जुलै) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आप्पा गोरे (रा. सोरतापवाडी) यांनी त्यांचे मोबाईलवरुन पुजारी यांचेशी संपर्क साधला व त्यांना लॉजच्या खाली बोलावले. तेथे एका कार मध्ये अमोल चौधरी व कानकोटे होते. कानकाटे याने त्यांना जबरदस्तीने ओढून गाडीत बसवले व तुला धंदा करायचा असेल तर दर महिन्याला १० हजार रुपये चालू करावे लागतील. जर तू पैसे दिले नाही तर तुझा धंदा चालू देणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले.
त्यानंतर पुजारी यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डी. के. पवार व पोलीस उपनिरीक्षक एन. जी. शिंदे हे करत आहेत.