लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा
By नितीश गोवंडे | Published: March 30, 2024 04:36 PM2024-03-30T16:36:20+5:302024-03-30T16:37:00+5:30
हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे....
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या घरी बोलवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी नुकतीच प्रसुत झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून सध्या तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेत आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे.
याबाबत १४ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २९) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर संदीप शर्मा (रा. एसआरए वसाहत, भारती विद्यापीठ, पुणे) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची दोन वर्षापूर्वी ओळख झाली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला स्वत:च्या आणि कात्रज येथील मित्राच्या घरी वारंवार बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने २७ मार्च रोजी संध्याकाळी एका बाळाला जन्म दिला.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन सागर शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाबड करत आहेत. आरोपी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सागर वर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सागर शर्मा विरोधात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.