आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:12 AM2019-03-22T01:12:24+5:302019-03-22T01:12:46+5:30
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या दोन मुलांवर आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर - वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या दोन मुलांवर आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या कायदा कलमान्वये अशा प्रकारे प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात या मुलांच्या ६४ वर्षे वयाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसमवेत राहतात. कवडीपाट टोलनाका परिसरात त्यांनी एक गुंठा जागा खरेदीखताने घेतलेली असून तेथे बांधण्यात आलेल्या तीन खोल्यांपैकी एकीमध्ये वृद्ध दाम्पत्य, तर शेजारच्या खोलीत मोठा मुलगा त्याची पत्नी एका मुलासह आणि त्याशेजारील खोलीत दोन नंबरचा मुलगा पत्नी व दोन मुलांसमवेत राहतो.
त्यांचे आई-वडील दोघे वयस्कर झाले असल्याने त्यांना काम होत नाही. दोन वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य दोन्ही मुलांना आपला सांभाळ करण्याची वारंवार विनंती करीत होते. सांभाळ करणे दूरच; उलट त्यांच्या दोन्ही मुलांनी ‘आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे सांगून आई-वडिलांना घरातून बाहेर काढले आहे. यामुळे हतबल झालेल्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे.