अधिकृत पार्किंगच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्यावर दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:05+5:302021-03-27T04:12:05+5:30
पुणे : नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा ...
पुणे : नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकीचालकांना धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या बंडू आण्णा आंदेकर याच्यासह एकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा. नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेमध्ये नागझरी भिंतीलगत अधिकृत पार्किंग नसतानाही बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळच्या नावाने अधिकृत पार्किंग असल्याचे भासवून खोटे पावती पुस्तक छापून फिर्यादीला दोनदा धमकी देऊन आणि दहशत पसरवून १० रुपये शुल्क वसूल करण्यात आले. या ठिकाणी दररोज ३५० ते ४०० रिक्षा आणि दुचाकी पार्क होतात. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली ३५०० ते ४००० हजार रुपये खंडणी स्वरूपात वसूल केले जात आहेत. अशा प्रकारे नागरिकांकडून ९० हजार ते १ लाख रूपये खंडणीद्वारे वसूल करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खोपडे करीत आहेत.
--------