मुंबईतील 'रेड झोन' मधून आलेल्या दोघांवर गुन्हा; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:46 PM2020-04-27T19:46:31+5:302020-04-27T19:46:53+5:30
मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील एका गावात मुंबईतील रेड झोनमधुन आलेल्या एका कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे राजगुरूनगर येथील वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात आतापर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही. याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तर नागरिकांनीही काळजी घेतली आहे. मात्र, भविष्यात असे घडू नये यासाठी प्रशासन प्रभावी उपायोजना राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहरेगावच्या लोकांना तालुक्यात प्रवेश नाही तर तालुक्यातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्यातच रेड झोन असलेल्या मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई केली आहे. तरीही तालुक्यात प्रशासनाला चकवा देत अनेकजण मुंबई पुणे येथून येण्याचे प्रयत्न करीत आहेत.
मुंबईतील रेड झोन मध्ये राहणा-या दोन व्यक्ती चास कमान धरण परिसरातील गावात आल्या होत्या. हे दोघे मुंबई येथील रेड झोन मधील सील केलेल्या बिल्डिंग मधून शासनाला चकवा देऊन खेड तालुक्यातील एका गावात आल्या आहेत. त्याची माहिती ग्रामस्थांनी तालुका आरोग्य विभाग व पोलिसांना दिली होती. त्याची तत्काळ दखल घेत त्यांना शासनाने सुरु केलेल्या राजगुरुनगर येथील संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात बाहेरगावरून आलेल्या व्यक्तींवर ग्रामस्थांनी तर शहरात शेजारी व सोसायटी मधील नागरिकांनी नजर ठेवावी व करोना विषाणू संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट
करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यात पुणे मुंबई पिंपरी चिंचवड या रेड झोन मधून येणा-या नागरिकांना सरकारी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवले जाणार आहे.
डॉ. बळीराम गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी
.....................................................
कोट
तालुक्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी पुण, मुंबई आदी रेड झोन मधून खेड तालुक्यात येणा-या नागरिकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांचे संस्थात्मक विलीगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील १४ वसतिगृहात सुमारे १२०० नागरिकांची व्यवस्था होईल अशा कक्षाची निर्मिती केली आहे. आपल्या गावात परिसरात बाहेरगावरून विशेषत: रेड झोन मधून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामस्थानी तात्कळ प्रशासनाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
- अंकुश राक्षे (सभापती पंचायत समिती, खेड )