हातावरील टॅटूवरून शोधला अल्पवयीन मुलीच्या बाळाचा बाप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:41 PM2021-11-29T17:41:16+5:302021-11-29T18:03:10+5:30
बारामती: अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक ...
बारामती: अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. या आरोपी युवकाला पोलिसांनी नाव माहित नसताना त्याच्या हाताच्या ‘टॅटू’वरुन शोध घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसमवेत ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली होती. मुलगी बारामतीची असल्याने शहर पोलीसांनी याबाबत तेथील पोलीसांनी माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचत पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंदवला.
मोरगाव रस्त्याकडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला. त्याने तिला फूस लावले. त्यातून त्यांचे निरा डावा कालव्यालगत काहीवेळा शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने मुलीला ‘ससून’मध्ये नेले. पोलिसांनी मुलीकडे आरोपीबद्दल चौकशी केली. मात्र, त्याच्या हातावर बदाम व हातावर सागर असे गोंदलेले आहे. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती पीडित मुलीने व तिच्या आईकडे नव्हती. मुलीने दिलेल्या वर्णनावरून गोपनीय पध्दतीने पोलीसांनी तपास सुरू केला.
या तपासात सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, धंदा क्लिनर, रा. गोजुबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायण नगर, बारामती शहर ) असे त्या युवकाची नाव असल्याची माहिती पुढे आली. ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या हातावर टॅटूचे वर्णन देखील मिळून आले. भा.द.वि. कलम ३७६ व पॉस्को कायद्याप्रमाणेच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केली. या प्रक़रणी आरोपीसह, अल्पवयीन मुलगी आणि गर्भाची ‘डीएनए’ तपासणी करण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.
प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी आदेश दिले होते. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे, यांनी तपास करून कौशल्याने उघड केलेला आहे. पीडित मुलीकडून कोणतेही नाव माहीत नसताना केवळ हातावरील टॅटूवरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.