वकिलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण : पूर्वीच्या भांडणाचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:49 AM2017-09-05T01:49:49+5:302017-09-05T01:50:01+5:30
पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर येथील नदीपात्रातील विसर्जन घाटात रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा प्रकार घडला.
अजय उत्तम फासगे (वय २९, रा. कळमकर चाळ, बाणेरगाव) यांनी याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अॅड. आशिष ताम्हाणे (रा. बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फासगे पाषाणमधील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरीबॉय म्हणून काम करतो. यापूूर्वी तो एका नगरसेवकाकडे चालक म्हणून काम करत होता. त्या वेळी या नगरसेवकाच्या कुटुंबातल्या सदस्यांची आणि अॅड. ताम्हाणे याची काही कारणावरून भांडणे झाली होती. त्या वेळी ताम्हाणे याने फिर्याद देऊन फासगे याला गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात पाठवले.
तसेच, ताम्हाणे याच्या गुंडांनीदेखील फासगेला दोन वेळा मारहाण केली होती. घाबरून त्यांनी तक्रार न देता कालांतराने या नगरसेवकाकडील कामदेखील सोडले होते, असे फासगे याने जबाबात म्हटले आहे. फासगे हा त्याचा मित्र दिगंबर चव्हाण याच्यासोबत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नदीकाठी गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता.
गणेश विसर्जन करून परतत असताना ताम्हाणेदेखील त्याच्या मंडळाचा गणपती विसर्जन करून परत चालला होता. दोघे समोरासमोर आले. त्या वेळी ताम्हाणे याने फासगे याला घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ करून, तुला महिन्याभरात जिवंत ठेवणार नाही, म्हणून तुझी काय लायकी आहे. तुम्ही जास्त उड्या मारू नका, तुला व तुमच्या घरच्यांना कुठे पाठवतो ते कळणार पण नाही. तसेच जातीचा उल्लेख करून तुमची भीक मागून खाण्याची लायकी आहे. तुला दोन वेळा जिवंत सोडलाय, पण आता तिसºयांदा कोणीही मध्ये येऊ दे घाबरणार नाही. तुला चांगलीच अद्दल घडवतो, असे म्हणून खुनाची धमकी दिल्याचे फासगे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.