'सिरम'मधील आगीचा क्राईम ब्रॅंच करणार समांतर तपास: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:42 PM2021-01-22T12:42:32+5:302021-01-22T12:43:14+5:30
सिरम इन्स्टिट्युटमधील आग लागण्याच्या घटनेची जगभरातून दखल घेण्यात आली.
पुणे : मांजरी येथील सिरमच्या एसईझेडमधील इमारतीवरील चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. या आगीमध्ये इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. अडीच वाजता लागलेली आग सुमारे साडेपाच वाजता विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र ही आगीची घटना अपघात की घात अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. आता पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
सिरम इन्स्टिट्युटमधील आग लागण्याच्या घटनेची जगभरातून दखल घेण्यात आली. कोविशिल्ड लसीमुळे या आगीकडे घातपाताचा प्रकार तर नाही, अशी शंका व्यक्त केली गेली. त्यामुळे सुरक्षा एजन्सीसह गुप्तचर यंत्रणा सर्तक झाल्या. अगदी राष्ट्रपती कार्यालयापासून केंद्रीय संस्थांनी याबाबत विचारणा केली. स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रात्री घटनास्थळी भेट दिली.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, सिरम इन्स्टिट्युट हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. स्थानिक पातळीवर या आगीचा तपास केला जाईल. त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या विशेष पथकामार्फत या आगीचा समांतर तपास केला जाणार आहे.