पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ नागरिकांवर खटले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:00 AM2020-08-23T00:00:45+5:302020-08-23T00:01:21+5:30
लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत.
पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. मात्र शहरातील काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन करतात. अशा १३५ नागरिकांवर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१) भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भादवि कलम १८८ अन्वये बुधवारी एमआयडीसी भोसरी (२२), भोसरी (९), पिंपरी (१३), चिंचवड (१०), निगडी (११), आळंदी (८), चाकण (२), दिघी (८), सांगवी (३), वाकड (६), हिंजवडी (७), तळेगाव दाभाडे (५), चिखली (२७), शिरगाव चौकी (४) या पोलीस ठाण्यांतर्गत १३५ नागरिकांवर खटले दाखल केले.
दारुबंदीचे १५ गुन्हे दाखल
दारुबंदी कायद्यांतर्गत देखील शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले. एमआयडीसी भोसरी (२), भोसरी (१), पिंपरी (२), निगडी (२), चाकण (५), सांगवी (१), हिंजवडी (१), तळेगाव एमआयडीसी (१) या पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे.