स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:32+5:302021-05-09T04:10:32+5:30
लाटे येथील पोलीस पाटील रुपाली वाघमारे यांनी दि. ५ मे रोजी गावातील रेशन दुकानदार माने हे दुकानातील गव्हाची ...
लाटे येथील पोलीस पाटील रुपाली वाघमारे यांनी दि. ५ मे रोजी गावातील रेशन दुकानदार माने हे दुकानातील गव्हाची पोती काळ्याबाजारात विकण्याच्या हेतूने टेम्पोतून (एमएच-१२, एफडी-१८५६) मधून घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. वाघमारे या चित्रीकरण करत असल्याचे मानेच्या निदर्शनास आल्याने त्याने टेम्पोत भरलेली पोती पुन्हा दुकानात ठेवली. वाव्हळ यांनी पणदरे विभागाचे मंडल अधिकारी रवींद्र पारधी यांना ही बाब कळविली. त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी शिरष्णेचे गाव कामगार तलाठी दत्तात्रय तलवार व कोऱ्हाळे बुद्रुकचे तलाठी प्रल्हाद वाळुंज यांना पंचनामा करण्यास सांगितले. या दोघांनी तेथे जात दुकानदाराला बोलावले. परंतु दुकान बंद करून ते निघून गेल्याने लाटेच्या सरपंच शीतल अनुराग खलाटे, पोलीस पाटील रुपाली वाघमारे या पंचांना सोबत घेत स्वस्त धान्य दुकान सील केले. त्यानंतर दि. ६ रोजी नायब तहसीलदार महादेव भोसले, वाळुंज यांनी या दुकानाचे सील केलेले कुलूप खोलून पाहणी केली. या वेळी ४८० किलो गहू अधिक आढळून आला. तर, ४५४ किलो तांदूळ कमी असल्याचे लक्षात आले. तसेच दुकानदाराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत लावलेली नव्हती. साठापुस्तक व विक्रीपुस्तक अद्ययावत ठेवले नव्हते. गव्हाची २०० किलो वजनाची चार हजार रुपये किमतीची चार पोती काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.