भोंदू महाराजावर फसवणुकीचा गुन्हा

By admin | Published: April 17, 2016 02:50 AM2016-04-17T02:50:19+5:302016-04-17T02:50:19+5:30

गिरीम (ता. दौंड) येथील भोंदू महाराज मनोहर चंद्रकांत भोसले (वय २५, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि त्याचा शिष्य विशाल ऊर्फ नवनाथ वाघमारे (वय २३, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर)

The crime of cheating on Bhondu Maharaj | भोंदू महाराजावर फसवणुकीचा गुन्हा

भोंदू महाराजावर फसवणुकीचा गुन्हा

Next

दौंड : गिरीम (ता. दौंड) येथील भोंदू महाराज मनोहर चंद्रकांत भोसले (वय २५, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि त्याचा शिष्य विशाल ऊर्फ नवनाथ वाघमारे (वय २३, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर) यांच्यावर फसवणुकीसह भोंदूगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्यात आजार बरा करतो, घरातील दडलेले सोने काढून देतो, असे आमिष दाखवत लाखोंनी नागरिकांना लुबाडले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दिली.
याप्रकरणी मीना जयराम जाधव (वय ३०, रा. गिरीम) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. यातील शिष्य विशाल वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य भोंदू मनोहरमहाराज भोसले फरार झाला आहे. एक महिन्याच्या आत आजार बरे करतो. घरात दडलेले सोने काढून देतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या मनोहरमहाराजाचं पितळ उघडे पडल्याने त्याने पलायन केले आहे. गिरीम येथील शिंगटेवस्तीवर या भोंदू महाराजाचे गेल्या दोन वर्षांपासून प्रस्थान होते. याच ठिकाणी त्याची सासुरवाडी आहे. दर गुरुवारी महाराजांचा दरबार भरायचा. या भोंदू महाराजावर तालुक्यातील काही भोळ््याभाबड्या जनतेचा विश्वास बसल्याने या दरबारात भाविकांची गर्दी असायची. विविध आजार बरे करतो, घरात सोनं काढून देतो, अशी फसवेगिरी हा महाराज करीत होता. मीना जाधव या महाराजांच्या आमिषाला बळी पडल्या. त्यांचा शारीरिक आजार बरा करतो, म्हणून त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. या महिलेने ४५ हजार रुपये एका संस्थेकडून कर्ज काढले आणि त्यात पाच हजार रुपये टाकून महाराजांच्या हवाली केले. महिन्यात आजार पूर्ण बरा होईल, असे सांगूनदेखील आजार काहीच बरा झाला नाही, म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: The crime of cheating on Bhondu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.