शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा
By Admin | Published: May 27, 2017 01:16 AM2017-05-27T01:16:02+5:302017-05-27T01:16:02+5:30
शिवसेनेचे कुरवंडेगावचे माजी सरपंच संजय दिलीप भोईर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांच्यासह तीन जणांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शिवसेनेचे कुरवंडेगावचे माजी सरपंच संजय दिलीप भोईर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांच्यासह तीन जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास टाटा धरणासमोरच्या सहारा पुलाजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी संजय भोईर यांच्या फिर्यादीवरून शिवसेना शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी (रा. जयचंद चौक, लोणावळा), माजी नगरसेवक गणेश इरले (रा. जुना खंडाळा, लोणावळा) व गणेश नारायण हुंडारे (रा. रायवुड, लोणावळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोईर यांना शहरप्रमुख बनविण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने शेट्टी व भोईर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामधून शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी दमदाटी केली असल्याचे भोईर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
गुरुवारी दुपारी शेट्टीसमर्थक हुंडारे यांनी त्यांना फोनवरून धमकी दिली होती. सायंकाळी ते गाडी वॉशिंग करण्यासाठी भुशी गावात गेले असताना पुन्हा हुंडारे याने फोन करून भेटायचे आहे, असे सांगितले. तेव्हा जयचंद चौकात भेटण्याचे ठरलेले असताना हुंडारे व इरले यांनी भुशी गावाच्या काही अंतरापासून भोईर यांच्या गाडीचा दुचाकीवरुन पाठलाग करीत सहारा पुलावर गाडी अडवली व तुला आज संपवतो म्हणत गाडीतून ओढत ओढत पुलाच्या खाली घेऊन गेले.
तेथे इरले याने हात पाठीमागे पकडले व हुंडारे याने पाठीला खोचलेल्या चॉपरसारख्या हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भोईर हे इरलेच्या हाताला हिसका देऊन पळाल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तिन्ही जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आय. जे. शेख तपास करीत आहेत.