गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:42 IST2025-02-25T16:39:12+5:302025-02-25T16:42:21+5:30
गजानन मारणेचा भाचा तीन दिवस झाला हजर झाला नाही. म्हणून मारणेला खोट गुंतवलं - मारणेचे वकील

गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : आयटी अभियंत्याला मारहाणप्रकरणी कुख्यात गुंड गजा ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (५७) याच्यासह टोळीविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. दरम्यान, पोलिस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाईचा इशारा गजा मारणे याला दिला होता. त्या भीतीपोटी गजा मारणे हा सोमवारी (दि. २४) त्याच्या आईसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात शरण आला. त्यानंतर आज त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने मारणेला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हा गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली असल्याचे मारणेचे वकील ठोंबरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ठोंबरे म्हणाले, आज कोर्टासमोर आम्ही सगळी बाजू मांडली. गजानन मारणे यांनी या मुलांना मारण्यासाठी प्रोत्साहित केला अशा प्रकारे स्टेटमेंट आलेला आहे. गजानन मारणे स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यांना फरशीवर बसून फोटो काढण्यात आला आणि तो वायरल करण्यात आला त्या संदर्भात देखील कोर्टाला आम्ही पत्र दिलंय. दोन दिवसात आम्ही याबाबत रिट पिटीशन दाखल करणार आहोत. गजानन मारणे तिथं नसतानाही घटना घडली. गजानन मारणे चा भाचा तीन दिवस झाला हजर झाला नाही. म्हणून गजानन मारणेला खोट गुंतवलं. आम्ही तपासाला सहकार्य करतोय सत्य बाहेर येईल. पूर्वीच्या सर्व गुन्ह्यातून गजा मारणे निर्दोष मुक्त आहे. गजा मारणे आजारी आहे. हार्टचा ऑपरेशन करायचा आहे. बीपी शुगरचा प्रचंड त्रास आहे.
कोथरूड परिसरात कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिस आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली.
गजा मारणेला जमिनीवर बसवले
गजा मारणेला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा अटक केली असून, त्याची कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१), अमोल विनायक तापकीर (३५, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा मारणे याचा भाचा असून, तो अद्याप फरार आहे. तर रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांनादेखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले आहे. गजा आणि रूपेश याला याबाबत चाहूल लागताच दोघे फरार झाले होते. कोथरूड पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके दोघांचा शोध घेत होती. मात्र ते मिळून येत नव्हते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोघांना जेरबंद करण्यास पथकांना सांगितले होते. त्यासाठी पोलिसांनी गजासह त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याच्या ७४ ठिकाणी झाडाझडती घेतली.