मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:00 PM2020-04-16T21:00:57+5:302020-04-16T21:02:40+5:30
लॉकडाऊनचा दुकानदार घेतात गैरफायदा
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकानी संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशावेळी केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र आता काही दुकानदार या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. चढ्या दराने मास्क आणि किराणा मालाची विक्री करत आहेत. अशा तीन दुकानदारावर गुन्हे शाखा युनिट 4 कडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूंडाराम खिनवाराम चौधरी (वय 30, रा.सागर पार्क लेन 1, वडगाव शेरी), हेमाराम नैनाराम चौधरी (वय 43, रा.नागपूर चाळ, येरवडा) आणि रमेश जेठाजी चौधरी (वय 35, रा.धनश्री अपार्टमेंट, औंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. भूंडाराम याचे चंदननगर याठिकाणी पवित्र मेडिकल स्टोअर्स आहे. या दुकानात त्याने कापडी मास्क विक्रीसाठी ठेवले आहेत. या दुपदरी कापडी मास्कची किंमत 16 रुपये असताना तो ग्राहकांकडून 50 रुपये घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, सहायक फौजदार अब्दूलकरीम सय्यद आणि पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागपूर चाळ याठिकाणी महालक्ष्मी सुपर मार्केट या नावाने किराणा मालाचे दुकान असणारे हेमाराम आर्थिक फायद्याकरिता दुप्पट दराने किराणा मालाची विक्री करत होते. त्यांनी खोबऱ्याची विक्री प्रतिकिलो 260 रुपये या दराने केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंध येथे असणाऱ्या जय हिंद सुपर मार्केटचे दुकानदार रमेश हे शेंगदाणा, गुळ, तूरडाळ यांची चढ्या दराने विक्री करत होते. याप्रकरणी त्यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गणेश पवार, भालचंद्र बोरकर, पोलीस नाईक दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, सागर घोरपडे, रमेश राठोड, विशाल शिर्के, अतुल मेंगे, सुहास कदम यांनी केली.