फटाके गोडाऊन मालकावर गुन्हा
By admin | Published: June 5, 2016 03:37 AM2016-06-05T03:37:46+5:302016-06-05T03:37:46+5:30
दौंडच्या फटाक्यांचे गोडाऊन मालक राजेंद्र पोखरणा (रा. अहिल्यादेवी होळकर सहकार चौक, दौंड) यांच्यावर स्फोटक पदार्थ बाळगण्यात हयगय करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा
दौंड : दौंडच्या फटाक्यांचे गोडाऊन मालक राजेंद्र पोखरणा (रा. अहिल्यादेवी होळकर सहकार चौक, दौंड) यांच्यावर स्फोटक पदार्थ बाळगण्यात हयगय करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेअंमलदार दिलीप भाकरे यांनी दिली आहे.
गुरुवारी (दि. २) सायंकाळी फटाक्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली होती. या आगीत मोठे नुकसान झाले; मात्र जीवितहानी झाली नाही. या संदर्भात दौंडचे पोलीस अण्णासाहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात फटाके ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही.
स्फोटक पदार्थांमुळे मानवी जीवन धोक्यात येईल व मालमत्तेचे नुकसान होईल, हे माहीत असतानादेखील गोडाऊन मालकाने कुठलीही दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)
विद्युततारांच्या घर्षणामुळे आग
या संदर्भात निकेत पोखरणा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की घटनास्थळी दोन नारळाची झाडे आहेत. या नारळांच्या मधून विद्युत महावितरण कंपनीची लाईन गेलेली आहे. हवेमुळे विद्युततारा घासल्या आणि उडालेल्या ठिणग्यांमुळे झाडावर असलेल्या सुक्या नारळांना आग लागली. यातील एक पेटलेला नारळ खाली पडला आणि त्यातून आग लागली.