कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक; नागरिकाला मारहाण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 01:53 PM2020-12-15T13:53:31+5:302020-12-15T18:49:25+5:30
ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकाला लाथाबुक्यांनी केली मारहाण
पुणे : ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी जाधव यांना मंगळवारी दुपारी अटक केली.
हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणार्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. याबाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. फिर्यादीच्या वडीलांनी आपलेी ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे त्यांना सांगत होते. तरीही जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही लाथ मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.