पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी
By नम्रता फडणीस | Updated: March 10, 2025 16:11 IST2025-03-10T16:10:20+5:302025-03-10T16:11:12+5:30
पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत

पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी
पुणे : शहरातील विविध भागात घरफोडीचे सत्र् सुरु असून, उपनगरांसह कमी वर्दळीच्या ठिकाणांवर चोरटयांनी नजर ठेवली आहे. कोथरूड, चतु :शृंगी, विश्रांतवाडी, शिवणेत भागात घरफोडीच्या घटना समोर आल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी परिसरात राहणार्या तरूणाच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ६ ते ९ मार्च कालावधीत घडली . याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतप्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम असा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख तपास करीत आहेत.
शिवणे परिसरातील श्रिया या रेसिडन्सीमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ११ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ५ ते ९ मार्च कालावधीत कामठे वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरूणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरूण गावाला गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ११ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करीत आहेत.
कोथरूड मध्ये राहत्या घरातील बेडरूममधील दिवाणामधून अज्ञात चोरट्याने ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दि. ६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोथरूड जवळील ऋतुरंग सोसायटीत ही घटना घडली. एका ५० वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
वानवडी भागातील मॅरीड वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील ३ लाख ६४ हजार रुपयांचे सोने- दागिने चोरून नेले. एका ३५ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चमन शेख पुढील तपास करीत आहेत. चतु:शृंगी भागातही सेनापती बापट रस्त्यावरील गोखलेनगर भागातील एका सोसायटीत राहत्या घरातून १ लक्ष ६८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एका ५२ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.