निलंबित पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:09+5:302021-04-27T04:10:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेमडेसिविरचा काळा बाजार करून जादा दराने विक्री केल्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांकडून पार्टी घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेमडेसिविरचा काळा बाजार करून जादा दराने विक्री केल्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या निलंबित उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षांच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोस्को तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बालेवाडी येथील एका फ्लॅटमध्ये घडली.
दीपक माने हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये सध्या कार्यरत होता. पोलीस आयुक्तांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाईक व फिर्यादीच्या दाजीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेला होता. माने व तिचा दाजी हे दारू पित बसले होते. त्यानंतर त्याने फिर्यादी व फिर्यादीच्या १६ वर्षांच्या बहिणीला बोलावून घेतले. मद्यधुंद अवस्थेत त्याने लहान मुलीबरोबर अश्लील वर्तन करून तिची छेडछाड केली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली.
याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळून आल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.