मोरवाडीतील डॉक्टरांवर गुन्हा
By admin | Published: December 22, 2016 01:55 AM2016-12-22T01:55:58+5:302016-12-22T01:55:58+5:30
डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरवाडीतील न्यू लाईफ केअर रुग्णालयाच्या
पिंपरी : डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरवाडीतील न्यू लाईफ केअर रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना मौलाना सय्यद (वय ४५, रा. कासारवाडी) असे मृत रुग्णाचे नाव आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. अन्सारी, डॉ. भालेराव, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राकेश सावंत आणि डॉ. शाहरुख पठाण यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना यांचे पती मौलाना सय्यद (वय ५०) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४ मे रोजी छातीत आलेल्या गाठीवर उपचार करण्यासाठी शबाना यांना मोरवाडीतील लाइफ केअर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना ५ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. त्या वेळी भोसरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे पती मौलाना सय्यद हे सोलापूर येथे रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला.
पोलिसांमार्फत मेडिकल बोर्डाकडे उपचाराची कागदपत्रे पाठविली. त्या कागदपत्रांच्या आधारे बोर्डाने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला.त्यानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)