बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:10 AM2018-07-12T02:10:04+5:302018-07-12T02:10:26+5:30
भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे - भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.
आयुब कासीम पटेल (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे शिक्षा देण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीला दत्तक घेतलेल्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ जून २०१२ रोजी वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीत हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. आरोपी पटेल हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर पीडित मुलगी ही अनाथ असून तिला एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या १७, १९, आणि १८ वर्षीय मैत्रिणींबरोबर भंगार गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने चौघींना जबरदस्तीने इमारतीतील पंपींग स्टेशन येथे डांबून ठेवले. आरोपीने पीडित मुलीला चौथ्या मजल्यावर नेऊन तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला.
साक्षीदार फितूर होऊनही पटेलला शिक्षा
पीडित मुलीच्या मैत्रिणी खटल्यात फितूर झाल्या होत्या. मात्र पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बांधकाम साईटवरील साहित्य चोरल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी मुलीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा बचाव पटेल यांच्या वकिलाने केला होता.