Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:00 PM2024-12-02T15:00:30+5:302024-12-02T15:03:03+5:30
डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली.
पिंपरी : चिंचवडमधील एका डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने फोन करून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवले. डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी मोहननगर, चिंचवड येथे घडली.
डॉ. भारत कांतीलाल शहा (७६, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी कुमार आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने डॉ. शहा यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी आहे असे सांगितले.
डॉ. शहा यांच्या क्रेडिट कार्डवरून एक कोटीचे व्यवहार झालेले आहे. त्याबाबत त्यांना सर्वोच्च न्यायालयाची आणि ईडीची खोटी नोटीस मोबाइलवर पाठवली. या प्रकरणामध्ये डॉ. शहा यांना अटक होण्यापासून वाचायचे असेल तर २० लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर इतर कारणे सांगून शहा यांच्याकडून एकूण २८ लाख ३५ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली.