Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

By नितीश गोवंडे | Published: December 2, 2024 10:55 AM2024-12-02T10:55:48+5:302024-12-02T10:57:44+5:30

आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली.

crime news Extension of time to file charge sheet in Vanraj Andekar murder case   | Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील १८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली.

आंदेकर खून प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला. याप्रकरणात २२ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. आंदेकर खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांची आहे. मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांपर्यंत वाढविता येते, असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितले.

आंदेकर खून प्रकरणचा सखोल तपास करण्यात असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे, तसेच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती, मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. सखोल तपासासाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.

आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून करण्यात आला. आंदेकर यांचे बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते.

कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.

Web Title: crime news Extension of time to file charge sheet in Vanraj Andekar murder case  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.