पुण्यात पाच दिवसांत पाच खून; शहरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:11 IST2024-12-05T10:58:43+5:302024-12-05T11:11:15+5:30

सतत वाढत जाणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे आता पुणेकर नागरिक भयभीत झाले आहेत.

crime news Five murders in 48 hours in Pune; There is fear in the city  | पुण्यात पाच दिवसांत पाच खून; शहरात भीतीचे वातावरण

पुण्यात पाच दिवसांत पाच खून; शहरात भीतीचे वातावरण

किरण शिंदे

पुणे - पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोड्या, दरोडे, स्ट्रीट क्राईम यासोबतच पुण्यात आता खुनाच्या घटना देखील समोर येत आहेत. मागील पाच दिवसांत पुणे पोलीस आयुक्तालयात खुनाचे पाच प्रकार उघडकीस आले आहेत. सिंहगड, वानवडी, कोंढवा आणि वाघोली परिसरात या घटना घडल्या आहेत. सतत वाढत जाणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे आता पुणेकर नागरिक भयभीत झाले आहेत.

सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ खून

मागील ४८ तासांत पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. पेट्रोल चोरीच्या संशयावरून नर्हे परिसरातील मानाजी नगरमध्ये चार जणांनी एका २० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या समर्थ भगत या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी सत्तूरने वार करून एका तरुणाचा खून केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वानवडीत ‘मुळशी पॅटर्न’

वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलेजला जात असलेल्या एका तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने सपासप वार करण्यात आले. रामटेकडीतील जामा मशीदीसमोर मंगळवारी ही घटना घडली. या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलगा बारावीच्या वर्गात शिकत होता. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

वडिलांना टकल्या म्हटल्याच्या रागातून खून

वाघोली-लोहगाव रस्त्यावरील अभिलाषा सोसायटीसमोर बुधवारी राजू लोहार (वय ४८) या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपी आणि मयत राजू लोहार दोघे दारू पीत बसले होते. दारू पित असताना राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून “तुझा बाप टकल्या आहे” असे म्हटले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले, आणि आरोपीने जवळ पडलेला दगड उचलून राजू लोहार यांच्या छातीत मारला. गंभीर जखमी झालेल्या राजू लोहार यांचा जागीच मृत्यू झाला.

कोंढव्यात डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून

कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज (गुरुवारी) पहाटे खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा येथील मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला या व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. मयत व्यक्ती हा फिरस्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: crime news Five murders in 48 hours in Pune; There is fear in the city 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.