Crime News : दुचाकी मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:36 IST2024-11-25T14:36:55+5:302024-11-25T14:36:55+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाच्या हद्दीत बर्गे वस्ती येथे ही घटना घडली.

Crime News : दुचाकी मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण
पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने दुचाकी मागे घेण्यास सांगितली. त्या कारणावरून दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला मारहाण केली. पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाच्या हद्दीत बर्गे वस्ती येथे शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली.
पोलिस अंमलदार प्रकाश नाईकरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चेतन माणिक शिंदे (३४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश नाईकरे हे चाकण वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाच्या हद्दीत बर्गे वस्ती येथे ते कर्तव्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास चेतन शिंदे दुचाकीवरून आला. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले.
त्याला नाईकरे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेतन शिंदे याने नाईकरे यांना मारहाण केली. यात नाईकरे यांची काॅलर धरून त्यांच्या गणवेशाची बटने तोडली. फिर्यादी नाईकरे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.