Crime News: बदनामीची धमकी देत महिलेने मागितली ५४ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 02:56 PM2021-11-15T14:56:24+5:302021-11-15T15:08:15+5:30
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मुंबई येथे घडला असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई शहर येथील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे
पिंपरी : हॉटेल व हॉटेलच्या ग्रुपची बदनामी करण्याची धमकी देत महिलेने ५४ लाखांची खंडणी मागितली. ईमेल, मोबाईल टेक्स्ट मेसेज व व्हाटसॲप मेसेज करून मुंबई येथे ४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अनुराग सर्वजीत भटनागर (वय ५६, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांची आणि आरोपी महिलेची कामानिमित्त ओळख झाली. त्यानंतर महिलेने वेळोवेळी ईमेल, टेक्स्ट मेसेज, व्हाट्सॲप मेसेजद्वारे फिर्यादीला संपर्क केला. फिर्यादीच्या हॉटेल्समार्फत ५४ लाख रुपयांची खंडणी मागितली.
दरवर्षी सहा कार्यक्रम आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी तीन लाख रुपये, असे सलग तीन वर्ष कार्यक्रम आयोजित करण्याची महिलेने मागणी केली. काम अथवा पैसे न दिल्यास फिर्यादी आणि फिर्यादीच्या हॉटेल ग्रुपची बदनामी करण्याची आरोपी महिलेने धमकी दिली. ताज हॉटेल आणि फिर्यादी यांच्या हॉटेल ग्रुपचे डायरेक्टर यांना फिर्यादी यांच्याविषयी खोटे सांगून फिर्यादीची बदनामी केली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मुंबई येथे घडला असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई शहर येथील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.