इंदापूर एसटी आगार व्यवस्थापकांना शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:50 PM2021-05-24T19:50:51+5:302021-05-24T19:53:31+5:30
मला नोकरीची गरज नाही, मी तुझा मर्डर करणार, सकाळपर्यंत तुला जिवंत सोडणार नाही याप्रकारे आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
इंदापूर (बाभुळगाव) : वरिष्ठांना अहवाल सादर का केला या कारणावरून दारूच्या नशेत इंदापूर एसटी आगार व्यवस्थापक यांच्या राहत्या घरी जात दारूच्या नशेत शिवीगाळ केली.व जीवे मारण्याची धमकी देत सुरक्षारक्षकाला दमदाटी व धक्काबुक्की केली.तसेच आगारातील महिला कर्मचारी यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावुन गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मेहबुब अब्दुल मजीद मनेर (आगार व्यवस्थापक, इंदापूर आगार) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दादा संभाजी माने (रा. सुरवड,ता.इंदापूर जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २२) रात्री ७:३० वा.चे सुमारास आरोपी दादा माने हा दारूच्या नशेत माझा अहवाल वरिष्ठांना सादर का केला असे म्हणत फिर्यादींना मोठमोठ्याने शिवीगाळ केली. मला नोकरीची गरज नाही, मी तुझा मर्डर करणार, सकाळपर्यंत तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी सुरक्षारक्षक दिपक व्यवहारे याने आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला दमदाटी व धक्काबुक्की केली. तसेच आगारातील महिला कर्मचारी यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. नंतर त्यांच्या अंगावर धावुन गेला. त्यानंतर सुरक्षारक्षक घटनास्थळी आल्यावर आरोपी रिक्षात बसुन निघून गेला व काही वेळाने पुन्हा परत तिथे येत फिर्यादी मनेर यांना शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की केली.
इंदापूर पोलिसांनी आरोपीविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.