लाच मागितल्याप्रकरणी हवेली तहसील कारकुनासह दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:50 AM2021-10-06T09:50:48+5:302021-10-06T12:44:22+5:30
पुणे : जमिनीच्या सपाटीकरणाची परवानगी मिळवून देण्याच्या बहाण्याने ७० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व ...
पुणे: जमिनीच्या सपाटीकरणाची परवानगी मिळवून देण्याच्या बहाण्याने ७० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व खासगी व्यक्ती अशा दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बालाजी सुधाकर चिद्दरवार (वय ५०, अव्वल कारकून, तहसील कार्यालय हवेली), खासगी व्यक्ती संजय महादेव जाधव (वय २८) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणाची परवानगी तहसीलदार हवेली यांच्याकडून मिळवून देतो असे सांगून खासगी व्यक्ती जाधव याने तक्रारदार यांच्याकडे ७० हजारांच्या लाचेची मागणी केली. २८ वर्षांच्या तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची २६ मार्च व २८ मे या कालावधीत पडताळणी केली असता, जाधव याने लाच मागितली असून, त्याला कारकून चिद्दरवार याने प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नसली तरी लाचेची मागणी करण्यात आली असल्याने मंगळवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत.