सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:32 PM2020-03-06T15:32:18+5:302020-03-06T15:42:12+5:30
या जागेवर सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
लोणावळा : शिलाटणे गावात राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या एका सेवाभावी ट्रस्टच्या जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न करत तेथील नागरिकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कामशेतमधील दोन जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंतीलाल वेदमुथा व कल्पेश जयंतीलाल वेदमुथा (दोघेही रा. कामशेत, ता.मावळ, जि. पुणे) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिरेन शहा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.
लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलाटणे गावात जमीन गट नं. 164/1 ही जागा इंद्रायणी हेवन्स नवजीवन ग्लोबल हार्ट व हेल्थ सेंटर या विश्वस्त संस्थेचे विश्वस्त सुधा रामचंद्र गायकर यांच्या नावे असून सातबारा उतार्यांवर देखील त्यांचे नावे आहे. सदर जागेमध्ये 1996 साली त्यांनी त्या जागेत 20 बाय 40 चे बांधकाम केले आहे. त्याची नोंद देखील त्याच्या नावे असून त्याचा कर ते शिलाटणे ग्रामपंचायतीला भरत आहेत. या जागेवर इंद्रायणी हेवन्स नवजीवन ग्लोबल हार्ट व हेल्थ सेंटर या सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. याकामाला सुरुवात होताच कामशेत येथील जयंतीलाल वेदमुथा यांनी सदरची जागा माझीच असल्याचे सांगत त्याठिकाणी उपचाराकरिता दाखल असलेल्या दोन रुग्णाांना तसेच त्याठिकाणी असलेल्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. तसेच जागेमधील घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. शहा यांनी केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर वरील गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.